ही तक्रार ब-याचदा ऐकायला मिळते. माझ्या मते अशी तुलना करूच नये कारण जश्या कोणत्याही दोन व्यक्ती भिन्न असतात तसेच कोणतेही दोन श्रवणदोष देखील भिन्न असतात.
कसे ते आपण पाहूया. श्रवणदोष एका कानात का दोन्ही कानात. एखादाया व्यक्तीला एकाच कानात तर दुस-या एखाद्यास दोन्ही कानात कमी ऐकू येत असेल, अशावेळेस ज्या व्यक्तीस दोन्ही कानांत कमी ऐकू येते त्या व्यक्तीस बोललेलं समजण्यास अधीक अडचण होते. त्याचबरोबर हे पण महत्वाचे आहे की दोन्ही कानांत श्रवणदोष असणारी व्यक्ती, दोन्ही कानांत श्रवणयंत्र वापरते आहे का नाही. दोन्ही कानांत श्रवणदोष असताना एकाच कानांत श्रवणयंत्र वापरणा-या व्यक्तीला श्रवणयंत्राचा पूर्ण लाभ कधीच मिळणार नाही. अशा कोणाही दोन व्यक्तींना श्रवणयंत्रातून मिळणारा लाभ वेगळाच असणार. दोन व्यक्तींचा श्रवणदोष असण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो. एखाद्या व्यक्तीस दुस-या व्यक्तीच्या तुलनेत अधिक काळा करीता श्रवणदोष असू शकतो. अशी सुद्धा शक्यता आहे की जुना श्रवणदोष असणा-या व्यक्तीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आवाजाकडे दुर्लक्ष करण्याची त्या व्यक्तीस सवय लागली आहे. असा काळ की ज्या दरम्यान सदर व्यक्तीचा आवाजा बरोबरचा संबंध दुरावला आहे. अशा व्यक्तीची जर एका दुस-या व्यक्ती बरोबर तुलना केली, ज्या व्यक्तीने श्रवणदोष आहे हे समजल्यानंतर लगेच त्यावर कृती करून, योग्य असे श्रवणयंत्र वापरायला सुरुवात केली आहे.. तर स्वाभाविकतः असं आढळेल की दोघांना यंत्राचा होणारा लाभ वेगवेगळा आहे.
श्रवणदोष मान्य आहे की नाही ?
अनेक वेळा असं अनुभवास येतं की श्रवणदोष असणारे काही जण आपला श्रवणदोष मान्य करायला खूप वेळ घेतात. मग अशा व्यक्ती श्रवणयंत्र मान्य करायला, आपलसं करायला पण अधिक वेळ घेतात. जेवढा अधिक वेळ तेवढा श्रवणयंत्राचा होणारा लाभ कमी. श्रवणयंत्र जेवढं लवकर आपलसं करून , त्याचाशी लवकर मैत्री होईल तेवढा लाभ अधिक.
श्रवणयंत्राकडून असणा-या अपेक्षा वास्तव का अवास्तव ?
ऐकण्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही श्रवणयंत्र घेण्यास इच्छुक असणारी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांच्याबरोबर एक समुपदेशनाचे सत्र घेतो त्यात श्रवणयंत्राच लाभ तसेच त्याच्या मर्यादा ह्याबाबत माहिती देतो. ज्यामुळे कोणाच्या मनात त्याबाबत काही अवास्तव कल्पना असतील तर त्याची सर्वांनाच जाणीव होते. जसे श्रवणयंत्र लावले की आता कितीही लहान, कुठूनही आलेला आवाज ( मग अगदी एकाच कानात यंत्र लावलेले का असेना) ऐकू यायला लागेल, श्रवणयंत्रातून फक्त बोलण्याचा तेवढाच आवाज येईल इतर आवाज येणारच नाहित इ. श्रवणयंत्राचा प्रत्येकाला निश्चितपणे लाभ होतो पण किती हे इतर काही गोष्टींवर देखील अवलंबून असते जसे :
श्रवणयंत्राकडून आपल्या अपेक्षा ठेवताना सर्वांकडून आधी ह्याचा विचार झाला पाहिजे तर अपेक्षा अवास्तव होणार नाहीत. म्हणूनच कोणाही दोन व्यक्तींना श्रवणयंत्राचा होणारा फायदा वेगवेगळा असू शकतो.