नवजात बालका पासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणत्याही वयात श्रवणदोष होऊ शकतो. वयानुसार त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात.
नवजात बालकामध्ये श्रवणदोष असण्याची काही कारणे आईच्या गर्भारपणात असतात तसेच अनुवंशिकता, जन्मानंतर लगेच झालेली काविळ इ. कारणांमुळे नवजात बालकात श्रवणदोष आढळून येतो. जितक्या लवकर बालकांमध्ये श्रवणदोषाचे निदान होईल तितक्या लवकर त्याचं’ऐकणं’ सुरु करण्या- साठी उपाय करता येतात. जेवढे लवकर आपण मुलाला ऐकण्याचे माध्यम (जसे श्रवणयंत्र किवा कॉक्लिआर इम्लांट ) देऊ, तेवढे बालक भाषा वेळेत म्हणजेच वयानुसार शिकू शकते. या मुळे बालकाचे बोलणे (वाचा) विकसीत होऊ शकते.
खरतर आता सरकारतर्फे सर्व हॉस्पिटल्सना सूचना केलेल्या आहेत की नवजात बालक हॉस्पिटलमधून घरी जाण्याच्या आधी म्हणजेच जन्मानंतर ४/५ दिवसात बाळाची श्रवणचाचणी होणे आवश्यक आहे. ही चाचणी अक्षरश: २ मिनिटांच्या आत होते आणि ह्यातून श्रवणदोष असण्याची शक्यता कळून येते. पुढच्या इतर चाचण्यांमधून श्रवणदोष असल्याची खात्री झाली तर बालकाला श्रवणयंत्र दिले जाते. जर श्रवणदोष तीव्र स्वरूपाचा असेल तर कॉक्लिआर इम्प्लांटचा विचार केला जातो.
सर्वच मुलांमधे जन्मापासून श्रवणदोष नसतो पण नंतर झालेल्या आजारामुळे (मेनिन्जायटिस, गालगुंड, व्हायरल फीवर इ. मुळे तो उद्भवू शकतो. हा श्रवणदोष मध्यम किंवा मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पण असू शकतो. मूल भाषा शिकण्याच्या वयातील असेल, तर मात्र या श्रवणदोषाचा भाषा शिकण्यावर परिणाम होतो व त्यामुळे मूल वयानुरूप भाषा आत्मसात करत नाही. मोजकेच शब्द वापरणं, छोटी वाक्य वापरणं, हाक मारली तरी प्रतिसाद न देणं, लांबून येणारा आवाज किंवा बोलणे अजिबातच ऐकू न येणं अशी लक्षणं हया मुलांमध्ये दिसून येतात. पण श्रवणदोष मध्यम स्वरूपाचा असल्यास, मूल जवळून येणाच्या आवाजाला प्रतिसाद देतं त्यामुळे श्रवणदोषावर उपाय केला जात नाही.
काही मुलांमध्ये शाळेत जाण्याच्या वयात म्हणजे ६ ते १० किंवा १२ व्या वर्षात सुद्धा हा श्रवणदोष उद्भवू शकतो. हया मुलांनी भाषा शिकण्याच्या वयात जरी भाषा आत्मसात केलेली असली तरी श्रवणदोषामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी, वेगळ्याच असतात. श्रवणदोषामुळे मुलांचे उच्चार चुकायला लागतात, किंवा ही मुले शालेय अभ्यासक्रमात मागे पडायला लागतात. थोडीशी एकलकोंडी होतात. अशा मुलांची त्वरीत श्रवणचाचणी करून त्यांना श्रवणयंत्र लवणे गरजेचे असत. एकदा का मुलं शिक्षणांत मागे पडायला लागली तर त्यातली गोडी कमी होते, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो याचा परिणाम त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वावरच होतो. शिक्षण असो, नोकरी असो, लग्न, नातेसंबंध, छंद जोपासणे, स्वतःची प्रगति साधणे अशा प्रत्येकच टप्प्यासाठी आपलं ‘ ऐकणं’ अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण त्यामुळे आपण जगाशी जोडले जात असतो.
म्हणूनच, कमी ऐकू येण्यामुळे माझं घरात, नोकरीत काही अडलं नाही असे म्हणणा-यांना मी सांगते की खरतर त्याबद्दल तुम्ही तुमच्या सहका-यांचे आणि कुटुंबियांचे आभार मानायला हवेत. त्यांनी तुम्हाला सांभाळून घेतलं म्हणून तुमचं अडलं नाही.
श्रवणदोष असल्यास (जो औषधोपचार वा शस्त्रक्रियेने दूर होत नाही असा) प्रत्येकाला स्वतःच्या दोषानुसार आणि आवश्यकतेनुसार श्रवणयंत्र वापरणं गरजेचं व फायदयाचं आहे. वयानुसार गरजा बदलत जातात पण ‘ऐकण्याची’ गरज प्रत्येकाला नेहमीच असते. कोणत्याही वयात श्रवणयंत्र त्या व्यक्तीची ही गरज पुरी करते.