अनेकांचा असा समज (खर तर गैरसमज) आहे की श्रवणयंत्र लावले नाही तर इतरांना कळणार नाही की मला कमी ऐकू येते. त्यामुळे काही जणांचा असा पवित्रा असतो की लावीन तर ‘न दिसून येणारे श्रवणयंत्र अन्यथा काहीच नाही’.. त्यांच्यासाठी ही थोडी अधिक माहिती.
श्रवणदोष मध्यम स्वरुपाचा असेल तर अशा व्यक्तीला समोरून आणि जवळून बोललेलं ऐकू येतं आणि समजत देखिल. पण मागून किंवा गोंगाट असताना बोललेले मात्र पटकन समजत नाही, जसे मार्केटमध्ये, दुकानात, बँकेत किंवा लग्नसमारंभात घडलेले संभाषण. कधी कधी तर त्यांना हाक मारलेली पण ऐकू येत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला कमी ऐकू येते आहे हे इतरांना सहज ओळखता येते.
श्रवणदोष तीव्र स्वरुपाचा असेल तर बऱ्याचदा संभाषण तुटक व एकतर्फी होते. गैरसमज होतात. प्रश्नच नीट न समजल्यामुळे वेगळच उत्तर दिले जाते, संभाषण पूर्णपणे न ऐकू आल्यामुळे तेच तेच परत बोललं जाते, ज्याचा कधीकधी कुटुंबियांना किंवा सहकाऱ्यांना त्रास होतो तर कधी तो चेष्टेचा विषय होतो. थोडक्यात श्रवणयंत्र न घातल्यामुळे दिसून येत नसले तरी ऐकण्याची अडचण काही लपून राहात नाही.
काही जण तर दिसतं म्हणून श्रवणयंत्र नको हा अट्टाहास इतका टोकाला नेतात की त्यामुळे येणारा एकटेपणा, नैराश्य, संवादाचा अभाव इ. गोष्टी सुद्धा मान्य करतात. परंतू असे करत असताना त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण आपल्याच माणसांना त्रास देतो आहोत. घरातला परस्पर संवाद कमी करतो आहे. आनंदाचं, सहजपणाचं वातावरण बिघडवतो आहोत.
थोडक्यात श्रवणयंत्र न घातल्यामुळे दिसून येत नसलं तरी आपला श्रवणदोष लक्षात येणारच आहे तर मग का न दिसणाऱ्या श्रवणयंत्राचा आग्रह धरून स्वताच्याच आयुष्यातला आनंद कमी करायचा ?
श्रवणयंत्र लावून माणसांत राहणं, आपल्या माणसांबरोबर जोडून राहणं, जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेणे, इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे करणं अधिक श्रेयस्कर नाही का ?