रिचार्जेबल श्रवणयंत्रे आजकाल खूपच चर्चेत आहेत. ब-याच जणांच्या पसंतीस उतरत आहेत.
आपल्याला माहितच आहे की श्रवणयंत्र बटण सेल वर चालतात. यंत्राच्या आकार, प्रकार, वापर आणि पॉवर हयावर त्यातली बॅटरी किती चालेल ते अवलंबून असतं. अगदी २/३ दिवसांपासून साधारण १ महिन्यापर्यंत श्रवणयंत्रातील बॅटरी साथ देते.
रिचार्जेल श्रवणयंत्रात मात्र आपल्या मोबाइल फोनसारखी बॅटरी आत बसवलेली असते जी आपल्याला काढता येत नाही. एकदा का श्रवणयंत्रे त्यांच्या चार्जर डबीत ठेवून चार्ज केली की मग कमीत कमी एक दिवस श्रवणयंत्र वापरणाऱ्या व्यक्तीस चिंता नसते. खरतर ही बॅटरी आरामातच एका दिवसापेक्षा अधिक काळ चालते परंतू जे श्रवणयंत्रांतील वायरलेस प्रणालीचा वापर अधिक करतात त्यांना मात्र रोज श्रावणयंत्रे चार्ज करावी लागतात.
बरं ही रिचार्जेबल श्रवणयंत्रे फक्त हया कारणाकरीताच ‘आधुनिक’ नाहीत. आवाजाची वाढीव गुणवत्ता, तसेच इतर सुविधा जसे गोंगाट कमी करणे, बोलणे स्पष्ट करणे, इ. गोष्टी देखिल वापर करणाऱ्या व्यक्तीला उपलब्ध आहेतच.
वय अधिक असणाऱ्या व्यक्तीना बऱ्याचदा रोज बॅटरीचे झाकण उघडून श्रवणयंत्र बंद करणे तसेच ते कोरडं राहण्याकरीता, बरोबर दिलेल्या डबीत झाकण उघडून ठेवणे, दर १५/२० दिवसांनी त्याची बॅटरी बदलणे ह्या गोष्टी अडचणीच्या वाटतात, त्यासाठी दुस-यावर अवलंबून राहावे लागते. रिचार्जेबल श्रवणयंत्रांच्या वापराने ह्या अडचणी देखिल दूर होतात. वापरून झाल्यावर चार्जर डबीत श्रवणयंत्रे ठेवली की ती कोरडी राहतातच आणि आपणहून बंद होतात.
आमचा आजकालचा अनुभव हे सांगतो की तरूणांना तर स्वाभाविकपणे रिचार्जेबल श्रवणयंत्र आवडत आहेतच पण वयस्कर लोकांना देखिल ती विशेष पसंत पडत आहेत.
पन्नाशीच्या आसपासची लोकं तर ह्या प्रकारावर फारच खूश आहेत कारण हा वर्ग तंत्रज्ञानाशी ओळख असणारा, नविन तांत्रिक गोष्टी सहज आत्मसात करू शकणारा, अजून हिंडू फिरू शकणारा आहे त्यामुळे बाहेर जाताना त्यांना आता बॅटरीज चा साठा घेऊन जावं लागत नाही आणि मोबाइल चार्ज करण्याची सवय असल्यामुळे, श्रवणयंत्र चार्ज करण सहज अंगवळणी पडतं.
रिचार्जेबल श्रवणयंत्र वापराबाबत एक मुद्दा पर्यावरणाशी पण निगडीत आहे. श्रवणयंत्र कुठलेही असो बॅटरीच त्याला उर्जा पुरवते. पण दर १५/२० दिवसांनी बॅटरी बदलणे हे तस तर पर्यावरणाच्या दृष्टीने फारसं अनुकुल नाहिच आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून देखिल रिचार्जेबल श्रवणयंत्राची निवड करणे अधिक शहाणपणाचे ठरेल.