श्रवणयंत्र हे ‘ऐकण्याचं‘ एक उपकरण आहे. पण ते फक्त आवाज मोठा करायचं कार्य करत नाही तर विविध प्रकारचं तंत्रज्ञान वापरून आवाज स्पष्ट व सुखकारक होईल अश्या पद्धतीने आवाज मोठा करतं.
मग ऐकण्याचा सराव का करायचा ? कारण गुणवत्ता सुधारून मोठा झालेला आवाज जरी कानापर्यंत पोहोचत असला तरी ‘ऐकण्याचं कार्य’ आपल्या कानालाच म्हणजेच पर्यायाने त्या व्यक्तीलाच करायला लागतं.
‘ऐकायचं’ म्हणजे काय? तर आपलयासाठी महत्त्वाचे, गरजेचे, जरूरीचे असलेले आवाज ऐकणे आणि जे सतत येत आहेत, महत्त्वाचे वा गरजेचं नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करणे. उदा : पंख्याचा, वा घरातील इतर आवाज जसे वॉशिंग मशीन, टि. व्ही, स्वयंपाकघरातील आवाज (अर्थात, गळणारा नळ, कुकरची शिट्टी नाही), खिडकी बाहेरून अधून मधून येणारा गोंगाटाचा आवाज इ. ह्या आवाजांकडे पूर्णपणे किंवा थोड्या काळाकरीता दुर्लक्ष्य करून, बोलण्याच्या आवाजाकडे अधिक लक्ष्य देणे म्हणजे ऐकणं.
जे खर तर आपलयातला प्रत्येक जण सततच करीत असतो. म्हणूनच रस्त्याचा जवळ किंवा अगदी रेल्वेलाईन च्या जवळ राहणा-या व्यक्ती सुद्धा म्हणतात की आम्हाला आता ह्या आवाजाची सवय झाली आहे, हा आवाज येत असताना सुद्धा आम्ही बोलू किंवा ऐकू शकतो, एकमेकांशी गप्पा मारू शकतो.
ऐकणं म्हणजे फक्त शब्द समजणं नव्हे. आपण खरतर शब्दात नाही तर वाक्यात बोलतो, शब्द नव्हे वाक्य समजून घेतो. त्यामुळे बोलतानाचे चढ-उतार, जोर देऊन बोललेले महत्त्वाचे शब्द, वाक्याची रचना, त्याची लांबी हे सगळे समजून घेणे म्हणजे ‘ऐकण’.
ज्यावेळेस एखाद्याला कमी ऐकू येऊ लागते तेव्हा सर्वप्रथम हळू आवाज (पंख्याचा, घराच्या बाहेरील रस्त्यावरून येणा-या रहदारीचा, पक्षांच्या किलबिलाटाचे आवाज )समजेनासे होतात, त्याच बरोबर बोलण्यातील चढउतार, हळू बोललेला वा जोर देऊन बोललेला शब्द, हया मधील फरक हया गोष्टी उमजेनाश्या होतात, हळूहळू ऐकणं कठीण आणि कष्टप्रद वाटू लागतं. त्यामुळे ‘ऐकण्याकडे दुर्लक्ष्य केलं जातं आणि ऐकण्यातला रस कमी होता. थोडक्यात ऐकण्याची सवय कमी होते.
म्हणजेच श्रवणयंत्र लावल्यावर सुद्धा जर मुळात ‘ऐकण्याची’ सवयच कमी झाली असेल तर मग बोलणे स्पष्ट कसे वाटेल ?
म्हणूनच श्रवणयंत्र लावल्यावर फिरून एकदा ‘ऐकण्याचा’ सराव करायला आम्ही सर्वांनाच सांगतो असे केल्याने श्रवणयंत्रा वापरणाऱ्या व्यक्तीस त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो.